पुणे : समुपदेशन खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पीएमपीएलने धड्क दिल्यामुळे अपघातात दोन्ही पाय गमवावा लागलेल्या ३९ वर्षीय महिलेला समुपदेशनामुळे लवकर न्याय मिळाला आहे. पहिल्या तारखेलाच दावा निकाली निघाला आहे. २० लाख रुपये तिला मिळणार आहेत. समुपदेशक अॅड.अतुल गुंजाळ यांनी या दाव्यात यशस्वी समुपदेशन केले.
अपघाताची घटना २१ ऑगस्ट २०२३ रोजी घडली. बाणेर येथे राहणाऱ्या त्या सांगवी येथील औंध रुग्णालय बीआरटी बसस्टॉप येथे रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी पीएमपीएलने त्यांना धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की, त्यांचे गुडघ्याच्या खाली दोन्ही पाय काढावे लागले. याबाबत सांगवी पोलीस स्टेशन येथे पीएमपीएल चालकावर गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणात त्यांनी अॅड. दीपाली मोरे यांच्यामार्फत पीएमपीएल आणि पीएमपीएलची विमा कंपनी असलेल्या इफको टोकीयोच्या विरोधात येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला. नुकसान भरपाईची मागणी केली. मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य बी.पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयातून हा दावा समुपदेशनासाठी समुपदेशक गुंजाळ यांच्याकडे पाठविण्यात आला. पहिल्या तारखेलाच त्यांनी दावा निकाली काढला. विमा कंपनीच्या वतीने अॅड. शशिकला वागदरीकर यांनी काम पाहिले.
त्या महिलेने अपघातात दोन्ही पाय गमावले होते. अशा परिस्थितीत समुपदेशनामुळे तिला लवकर न्याय मिळवून दिल्याचा आनंद वाटत आहे. यामुळे तिचा न्यायालयीन लढाईसाठी जाणारा वेळ वाचला आहे.
– अॅड. अतुल ग्ंजाळ, समुपदेशक