शिरगाव – संसाराचा गाडा हाकण्यासाठी तिने चक्क वस्तरा हाती घेतला आहे आणि पुरुष जसे पुरुषांची दाढी करतात, तशीच ती महिला असूनही पुरुषांची करते. पुरुष महिलांचे केस कापतात असे म्हटल्यावर काही वावगे नाही. परंतु एक महिला पुरुषांचे केस कापते आणि तेही अगदी सफाईदारपणे, असे म्हटल्यावर आश्चर्य वाटते. परंतु, हे खरे करून दाखवले आहे. सोमाटणे येथील महिला धनश्री तेवरे यांनी.
याविषयी अधिक माहिती अशी की, धनश्री रोहित तेवरे या गेली १२ वर्ष सोमाटणे येथे राहतात. अगदी काही महिने वय असताना आई गेली आणि आजीने काही कळायच्या लग्न लावून दिले. जबाबदारीची जाणीव व्हायच्या आधीच त्यांना संसार गळ्यात मारला गेला. आजीशिवाय जगात कोणीच नव्हते मग ती सांगेल त्या पूर्व दिशा मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हता. लग्नानंतर काहीच दिवसात आजीही वारली आता सासरच माहेर समजायचे आणि पुढे जाण्याचे ठरवले. नवरा एकटाच कमावतो तेही संसाराला पुरत नाही, काही आपण करावे तर शिक्षण नाही, मग संसार चालवायचा कसा. हा एकच प्रश्न त्यांना सतावत होता. त्यात दोन मुलं झाली. त्यांचे शिक्षण पालनपोषण कसे करायचे, याच जाणीवेतून त्यांनी व्यवसाय करायचे ठरवले.
५ वर्षापूर्वी त्यांनी ब्युटी पार्लर टाकले. परंतु, महिलांकडून हवा तेव्हडा प्रतिसाद मिळाला नाही, मग धनश्री यांनी पुरुषांची दाढी व कटिंग करायचे ठरवले व आज गेली ३ वर्ष त्या अगदी पुरुषा इतकीच दाढी, कटिंग, फेशियल, मसाज, लहान मुलांची कटिंग सफाईदारपणे करतात. नवीन असताना मला थोडं चुकल्यासारख वाटायचं आणि ग्राहकानाही वेगळ वाटायचं. परंतु, आता सर्व सुरळीत सुरु आहे. प्रथम पतीने विरोध केला. जगाच्या वेगळ नको करायला, परंतु पोटाच्या आगीने त्यांचा विरोध गिळंकृत केला आणि परवानगी मिळाली. एक वेळ विरोध करणारा नवरा आता माझ्या कामाचा अभिमान बाळगतो, यापेक्षा मोठी गोष्ट माझ्या नाही.
धनश्री यांना ८ आणि १० वयाची दोन मुलं आहेत. त्याचं सर्व करून त्यांना शाळेत पाठवून त्या सकाळी सलूनमध्ये जातात. मुलं घरी येईपर्यंत काम करतात. पुन्हा मुलं शाळेतून आली की, त्यांना सोबत घेवून सलूनमध्ये येतात. संध्याकळी स्वयंपाक करायला, काही वेळ घरी जावून पुन्हा सलूनमध्ये, असा त्यांचा रोजचा दिनक्रम सुरु आहे. तेही गेली ३ वर्ष हा अखंडपणे.
जगातील जवळपास सर्वच नवरे आपल्या बायकोला, मुलांना सूख सुविधा मिळाव्यात म्हणून काम करत असतात. परंतु, मला माझ्या नवऱ्याला आणि मुलांना सुखसुविधा देणारी बायको आणि आई व्हायचं आहे. यावरून त्यांचे विचार लक्षात येतात. नवरा आणि मुलांप्रती असणारी तळमळ लक्षात येते. मला माझ्या पालकांकडून जे मिळाल नाही, ते मी माझ्या पाल्यांना देणार आहे. त्यासाठी मला काहीही कराव लागलं तरी बेहतर.
– धनश्री तेवरे, महिला सलून व्यावसायिक.