मुंबई – नृत्य करताना वादग्रस्त हावभावांमुळे सतत वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या गौतमी पाटील हिला राष्ट्रवादीच्या मंचावर बोलावू नका, अशी तंबीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना दोन दिवसांपूर्वी दिली होती. तिला आपल्या मंचावर नृत्यासाठी कुणीही बोलावू नये, अशी ताकीदच अजित पवार यांनी यावेळी दिल्याचं दिसून आलं होत. दरम्यान, आता अजित पवरांच्या या इशाऱ्यानंतर खुद्द गौतमी पाटीलने आपली भावना व्यक्त करत अजित पवार यांची माफी मागितली आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गौतमी पाटील हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलच चर्चेत आहे. त्यासोबत चर्चेत आहेत गौतमी पाटीलने केलेल्या डान्सचे व्हिडीओ आणि याच व्हिडीओमुळे आज गौतमी पाटील सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. डान्स दरम्यान केलेलं अंगविक्षेप यामुळे गौतमीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, नेटकरी देखील तिच्या या व्हिडिओवर जोरदार कमेंटचा वर्षाव करत असतात. मात्र, आता याच गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर अजित पवार यांनी बंदी घातल्यामुळे गौतमी पाटीलने सपशेल शरणागती पत्करल्याचे दिसून आले आहे.
आपल्या व्हिडिओत गौतमी म्हणाली की, “पूर्वी मी चुकले होते आणि त्यासाठी वारंवार माफी देखील मागितली आहे. आता मी माझ्या नृत्यशैलीमध्ये, वेशभूषेमध्ये बदल केला. मी अश्लील नृत्य तसेच वादग्रस्त हावभाव करत नाही. अजितदादा खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. दादा मी चुकले पण आता मी माफी मागते..’, असं म्हणत गौतमीने माफी मागितली आहे.