भुवनेश्वर – ओडिशाच्या अंगुल जिल्ह्यातील एनटीपीसीच्या कनिहा वीज निर्मीती प्रकल्पाला आज आग लागली, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तालचेर परिसरात कोळसा वाहतूक करणाऱ्या प्लांटच्या कन्व्हेयर बेल्टमध्ये सकाळी ८.१० वाजता ही आग लागली.आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
सीआयएसएफच्या अग्निशमन पथकाने ही आग आटोक्यात आणली. आता ही आग पुर्ण विझली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. आगीत किती नुकसान झाले याचीही माहिती मिळालेली नाही.
अग्निशमन पथकातील एका कर्मचाऱ्याला किरकोळ जखमा झाल्या. त्याला प्राथमिक उपचारानंतर लगेच सोडण्यात आले. सावधगिरीचा उपाय म्हणून, ५०० मेगावॅट वीज उत्पादन करणारे युनिट-3 थोड्या काळासाठी बंद करण्यात आले.
ते लवकरच पुन्हा कार्यान्वित केले जाणार आहे. आगीचे कारण आणि नुकसानीचे मूल्यांकन केले जात आहे, आवश्यक दुरुस्तीचे काम लवकरच सुरू केले जाईल असे एनटीपीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले.