पाटण :- सोशल मीडियावर करण्यात आलेल्या एका पोस्टवरून गुजरातमधील पाटण जिल्ह्यात झालेल्या जातीय संघर्षानंतर आठ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत दहा जणांना अटक केली आहे.
सोशल मिडीयावरील ही पोस्ट नेमकी काय होती याचा तपशील पोलिसांनी उघड केलेला नाही पण केरळ स्टोरीच्या विषयावर ही पोस्ट होती अशी माहिती मिळाली आहे. त्यावरून दोन धर्मातील समुदायांमध्ये बलिसाणा गावात ही चकमक झाली.
अटक करण्यात आलेल्या दहा आरोपींविरुद्ध दंगल, प्राणघातक हल्ला आणि खुनाचा प्रयत्न अशा विविध आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोमवारी तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी अटक केलेल्या काही आरोपींना बालिसाणा येथील मशीद चौक परिसरात नेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.