मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणी विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर चौफेर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणी “स्वतःच्या कर्माने मरणाऱ्याला धर्माने मारू नका,’ असे एक सूचक ट्विट केले आहे.
राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये यापुढेही बरेच काही घडणार असल्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, आमच्यावर आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. ते सांगायचे, जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका. आता नेमके तसेच घडत आहे. यापुढे देखील बरंच काही घडणार आहे. जे जे होईल ते पाहत राहावे.. जय महाराष्ट्र!
राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते आदित्य ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टॅग केले आहे. त्यांनी या प्रकरणी किरीट सोमय्या किंवा त्यांच्या व्हायरल व्हिडिओचा कोणताही उल्लेख केलेला नाही. पण त्यांचा अंगुलीनिर्देश त्यांच्याकडेच होता, हे स्पष्ट आहे.
दानवेंचा सभागृहात सरकारवर हल्लाबोल
दुसरीकडे, ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी सरकारला धारेवर धरले. काही राजकारणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांच्या महाराष्ट्रातील संस्कृतीला छेद देण्याचा प्रयत्न करत आहेत.
विविध पदांची प्रलोभने दाखवून, ईडी, सीबीआय सारख्या तपास यंत्रणांची भीती दाखवून महिला अधिकाऱ्यांना धमकावून त्यांची पिळवणूक व शोषण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते सोमय्या यांच्यावर हल्लाबोल करताना म्हणाले.
सोमय्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्रद्रोही
यावेळी त्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सोमय्यांशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओचा समावेश असणारा पेनड्राईव्ह सुपूर्द केला. सदर पेनड्राइव्हमध्ये मराठी स्त्रियांविषयी अश्लिल भाषेत संभाषण आहे. त्याचा योग्य तो तपास करा.
मराठी महिलांविषयी अशा शब्दांत संभाषण करणारे किरीट सोमय्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्रद्रोही आहेत, असे दानवे यावेळी सोमय्यांवरील आपली टीका अधिक धारदार करताना म्हणाले. वादग्रस्त पेनड्राइव्हचे अवलोकलन करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी दानवेंनी सभागृहात लावून धरली.