वाठार स्टेशन (प्रतिनिधी) – आदर्श ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था सोनके या संस्थेतील संचालकांनी ठेवीदारांची फसवणूक करून जवळील नातलगांच्या नावे बोगस कर्ज वाटप दाखवून 12 कोटी 87 लाख 47 हजार 734 रुपयांचा (व्याज सोडून) अपहार केल्याबद्दल संस्थेच्या 21 संचालकांविरोधात वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनके (ता. कोरेगाव) येथील आदर्श ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या सातारा, पिरवाडी- खेड, सैदापूर, वाई, शिरवळ या शाखांतून याच संचालकांची असलेल्या आदर्श वास्तू निर्मिती कंपनीस तसेच जवळच्या नातलगांच्या नावे बोगस कर्ज दाखवून व फिरवाफिरवी करून पैशांचा अपहार केला.
तसेच या दाखवलेल्या बोगस कर्जामध्ये वेळोवेळी रोख भरणा केल्याचे भासवून थकबाकीत कर्ज उत्पादित दाखविले आहेत. त्यानंतर सहकार खात्याने दिलेल्या निर्देशानुसार गुंतवणूक दाखवण्यासाठी बोगस ठेव रकमे बाबतची बनावट कागदपत्रे तयार करून रामानंद मल्टीस्टेट को सोसायटी ही संस्था अस्तित्वात नसतानाही ही संस्था असल्याचे भासवून ठेवीदारांची फसवणूक केली आहे.
या अपहाराची फिर्याद सनदी लेखापाल विष्णू बाळासाहेब साळुंखे यांनी वाठार पोलीस स्टेशनला दिली असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले करीत आहेत.