सातारा – करोनाने पुन्हा एकदा राज्यात शिरकाव केला असून गेल्या दोन दिवसापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात करोनाचे रूग्ण आढळून आले होते. मात्र, आता सातारा जिल्ह्यात करोनाचा शिरकाव केला आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन खडबडून जागे झाले आहे. खटाव तालुक्यातील पुसेगावमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
सदर महिला कोरेगाव येथील वास्तव्यास असून ती पुसेगाव येथील प्रा आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेविका असल्याची माहिती आहे. पस्तीस वर्षीय महिला रुग्णाला येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . या महिलेचे घशाचे स्राव पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत . याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो व्हेरियंट जेएन1 आहे की नाही याची पुष्टी होईल असे अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक डॉ राहुल जाधव यांनी सांगितले.
सन 2020 मध्ये करोना संसर्गाने भारतात हाहाकार केला. यावेळी लाॅकडाऊनही करण्यात आल्याने देशावर मोठे संकट आले होते. त्यानंतर करोना बाधितांमध्ये चढ- उतार पहायला मिळत आला आहे. अनेकदा प्रशासनाने अनेक नियमावली जाहीर करत करोनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पुन्हा एकदा गेल्या काही दिवसापासून करोनाने डोके वर काढल्याचे पहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यात पुसेगाव येथील एका महिलेला करोनाची लागण झाली असून तिची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी करोनाचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. करोना रूग्ण आढळल्याने लोकांनी भीती बाळगू नये तर सूचनाचे पालन करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
आरोग्य यंत्रणा पुन्हा अलर्ट मोडवर
सातारा जिल्ह्यात करोनाचा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे . जिल्हा रुग्णालय प्रशासनाने २५ बेडचा स्वतंत्र कक्ष सक्रीय केला आहे . तसेच गरज पडल्यास दोनशे ऑक्सीजन बेड युध्द पातळीवर तयार ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचे अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक डॉ राहुल जाधव यांनी सांगितले . सदर महिलेची प्रकृती स्थिर आहे . मात्र करोनाचा हा व्हेरिएंट जेएन१ आहे का याचा अहवाल पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा येथून प्राप्त झाल्यावरच पुढील परिस्थिती स्पष्ट होईल असे ते म्हणाले .