शासनाने प्रलंबित प्रश्न त्वरीत मार्गी न लावण्यास तीव्र आंदोलन करणार
पुणे(प्रतिनिधी) – राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. शासनाने मागण्यांबाबत त्वरीत आदेश न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांबाबत शासनाला अनेकदा निवेदने देण्यात आलेली आहेत. विविध पध्दतीने आंदोलनेही करण्यात आलेली आहे. शासनाने यावर बैठका घेऊन केवळ आश्वासने दिली आहेत. त्यामुळे शिक्षक संतप्त झालेले आहेत. त्यामुळे पुन्हा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आलेला आहे. या आंदोलनात शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.संतोष फाजगे, कार्याध्यक्ष प्रा.तुकाराम साळुंखे, सरचिटणीस प्रा.लक्ष्मण रोडे यांच्यासह इतर शिक्षकही सहभागी झाले होते.
मूल्यांकन पात्र घोषित व अघोषित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वेतन अनुदान देणे, सन 2002-03 पासून वाढीव पदावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना पद मंजूरी देवून वेतन अनुदान देण्यात यावे, आयटी विषय शिक्षकांना वेतन श्रेणीत वेतन देण्यात यावे, सर्व शिक्षकांना जूनी पेन्शन योजना लागू करावी, शासकीय कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 वर्षांच्या सेवेनंतर मिळणारी आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी, आदी मागण्या शासनाकडे करण्यात आलेल्या आहेत.
शालेय शिक्षणंमत्री वर्षा गायकवाड यांनी एका महिन्यात प्रलंबित मागण्यांबाबत निर्णयाचे आदेश काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणीच झाली नाही. पुन्हा बैठकीसाठी वेळ मागितली असता ती अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आहे. शिक्षक दिनी राज्यातील सर्व शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला आहे.