पुणे – चाकुचा धाक दाखवून रिक्षा चालकाला लूटणाऱ्या तिघांना हडपसर पोलिसांनी 24 तासात अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन मोबाईल, रोख रक्कम, चाकु, झायलो गाडी असा 5 लाख 19 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मीत्राचा मोबाईल हरवल्याने त्याने नवीन मोबाईल घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. यामुळे त्यांनी जबरी चोरी करत मोबाईल आणि रोकड लूटली.
आरोपींनी एका रिक्षा चालकास सार्वजनीक मुतारीजवळ चाकुचा धाक दाखवून लूटले होते. त्याचा फोन आणि रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेली होती. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हयाचा तपास करताना सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, पोलिस नाईक नितीन मुंढे, पोलिस शिपाई शशीकांत नाळे, अकबर शेख, प्रशांत टोणपे यांना आरोपी चारचाकी गाडीत डी.पी.रोड येथे थांबल्याची खबर मिळाली होती.
त्यानूसार घटनास्थळी जावून बाबासाहेब वसंत कदम (30,रा.हडपसर, मुळ पानवडी, जि. उस्मानाबाद), संतोष शंकर गुंजाळ (24,रा.शेवाळेवाडी), विनीत रामचंद्र वाकडे (24,रा.वृंदावन सोसायटी, खराडी) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या अंगझडतीमध्ये मोबाईल, रोख रक्कम आणि धाक दाखविण्यासाठी वापरलेला चाकु आढळला. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबुल केला.
याप्रकरणाचा तपास अप्पर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी, पोलिस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे, पोलिस निरीक्षक हमराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक फौजदार युसुफ पठाण, पोलिस कर्मचारी रमेश साबळे, राजेश नवले, सैदोबा भोजराव, विनोद शिवले, नितीन मुंडे, अकबर शेख, शशिकांत नाळे, शाहिद शेख, प्रशांत टोणपे यांच्या यांच्या पथकाने केली.
आरोपी पोलिस भरतीसाठी होता प्रयत्नशील
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार यातील गुंजाळ हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. तर त्याचा खास मित्र विनीत वाकडे आहे. विनीत हा सधन कुटूंबातील असून स्वत: बॉक्सर आहे तर त्याची बहिणी डेटीस्ट आहे.तो पोलिस भरतीसाठी प्रयत्नशील होता. या दोघांनी लॉक डाऊनमध्ये भाजीविक्रीचा व्यवसायही केला होता. त्यांचा कॉमन मित्र बाळासाहेब कदम हा एका झायलोवर चालक आहे. त्याचा मोबाईल हरवला असल्याने त्याने गुंजाळकडे मोबाईल घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.
मित्राला मोबाईल घेऊन द्यायचा म्हणून गुंजाळने जबरी चोरीचा कट रचला. हे तीघे झायलोमधून जात असताना त्यांना सार्वजनीक मुतारीजवळ एक रिक्षा चालक उभा दिसला. त्याच्या वरच्या खिशात त्यांना दोन ऍड्रॉईल मोबाईल दिसले. त्यांनी गाडीतून खाली उतरत रिक्षा चालकाला चाकूचा धाक दाखवला. यानंतर विनीतने त्याला मागून घट्ट पकडले. त्याच्या खिशातील मोबाईल आणि रोकड काढून घेतल्यावर तीघेही झायलो मधून निघुन गेले.