प्राचीन शिवमंदिर ‘घोरवडेश्‍वर’

पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथे शेलारवाडीची बौद्धकालीन लेणी आहेत. या लेण्यांमध्ये घोरवडेश्‍वर हे प्राचीन शिवमंदिर आहे. पुणे ते घोरवडेश्‍वर हे अंतर 35 किलोमीटर आहे. या लेण्यांमध्ये असलेल्या शिवमंदिरामुळे तसेच येथून जवळच असलेल्या घोरवडे गावामुळे या लेण्यांना घोरावडेश्‍वर असे म्हणतात.

संत तुकाराम महाराज यांचे हे साधनास्थळ असल्याने वारकरी संप्रदायात या परिसराला खूप महत्त्व आहे. या डोंगरावर जाण्यासाठी पायऱ्यांची सोय आहे. एक चैत्यगृह आणि बाकीचे विहार अशी रचना आहे. काही विहार थोडेसे उंचावर खोदलेले दिसून येतात. आतमध्ये राहण्यासाठी छोटे कक्ष, झोपण्यासाठी ओटे अशी रचना आहे. माथ्यावर पोहचल्यावर उजवीकडच्या बाजूला चैत्यगृह आहे. तेथे शिवमंदिर आहे. सभामंडप, त्यात ओटे आणि आत गर्भगृह अशी रचना आहे. आतील बाजूस शिवलिंग आहे.

शिवलिंगावर पितळेचा नागराज आणि पितळेचा त्रिशूल डमरू आहेत. सभामंडपातही ब्राम्ही शिलालेख कोरलेला आहे. गर्भगृहात आज शिवलिंगाची स्थापना झालेली दिसत असली तरी तिथल्या मूळच्या स्तूपरचनेतील हर्मिकेची चौकट आजही तिथे स्पष्ट दिसते.

वरच्या प्रशस्त विहारात प्रस्तरारोहण करून जावे लागते. विहाराच्या बाहेर दोन नंदी आहेत. तिथेही शिवलिंग आहे. गणपती, देवी मूर्ती व स्तंभांवर हत्ती कोरलेले दिसतात.

– माधुरी शिवाजी विधाटे 

Leave A Reply

Your email address will not be published.