लोणी काळभोर – हवेली तालुक्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 12 खासगी रुग्णालयांमधील 1700 बेड ताब्यात घेऊन बाधितांवर मोफत उपचार होतील, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिले होते. मात्र, वीस दिवसानंतरही प्रशासनाला हे टार्गेट पूर्ण करता आले नाही. त्यामुळे ही गर्जना खोटी ठरली आहे. केवळ 598 बेडच हाती आल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी (दि.8) विविध भागातील 12 खासगी रुग्णालयातील सतराशे बेड अधिगृहित करण्याचे आदेश पंचायत समितीला दिले होते. मात्र, पंचायत समिती व आरोग्य विभाग खासगी रुग्णालयांमधील बेड अधिगृहित करण्यास कमी पडल्याचे दिसून येत आहे. हवेली तालुक्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांनी उरुळी कांचन येथे प्रशासनाची बैठक घेऊन प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या.
बैठकीच्या दुसऱ्याचदिवशी उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी आय मॅक्स हॉस्पिटल (80), लाईफ लाईन हॉस्पिटल (52), केअर हॉस्पिटल (60), पल्स हॉस्पिटल (40) महेश स्मृती (32), चिंतामणी हॉस्पिटल (40), श्लोक हॉस्पिटल (41), शिवम् हॉस्पिटल (40), नवले हॉस्पिटल (960), विश्वराज हॉस्पिटल (200), भारत संस्कृती दर्शन ट्रस्ट (132) व प्रयागधाम हॉस्पिटल (80) या बारा रुग्णालयांतील सतराशे बेड तत्काळ अधिगृहित करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते.
बेड देण्यास खासगी रुग्णांलयांनी नकार दिल्यास रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्याच्या सूचना बारवकर यांनी दिल्या होत्या. मात्र, वीस दिवसानंतरही चाळीस टक्क्यांहुनही कमी बेड अधिगृहित करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. त्यामुळे हवेलीकरांना कोणी वालीच नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
बेड उपलब्ध करून देण्यास रुग्णालयांची टाळाटाळ
खासगी रुग्णालयांनी बेड अधिगृहित करण्यास नकार दिल्यास, संबंधित रुग्णालयांच्या प्रशासनावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी दिले आहेत. मात्र, या बारापैकी अपवाद वगळता सर्वच रुग्णालयांनी बेड उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. त्यामुळे 1700 पैकी केवळ 598 बेड उपलब्ध झाले आहेत. बहुसंख्य रुग्णालयाचे चालक-मालक हे मोठे व वजनदार मंडळी असल्याने कायदेशीर कारवाईची घंटा नेमकी कोण गळ्यात बांधणार, यावर कारवाई लटकली आहे.
हवेलीचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी वीस दिवसांपूर्वी 1700 बेड अधिगृहित करण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात मात्र, केवळ 598 बेड आरोग्य विभागाच्या ताब्यात आलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्या आदेशाप्रमाणे वारंवार मागणी करूनही खासगी रुग्णालय प्रशासन वेळकाढूपणाचे धोरण राबवत असल्याने बेड अधिगृहित करण्यात अडचणी येत आहेत. याबाबत सर्वच 12 खासगी रुग्णालयांच्या प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. यातून मार्ग काढण्याचे काम सुरू आहे.
– डॉ. सचिन खरात, तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी, हवेली.