कोल्हापूर – फसवणूक केल्याप्रकरणी फायनान्स कंपनीच्या एजंटसह तिघांवर इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. इचलकरंजी शहरात गोरगरीब महिलांना कर्जाचे आमिष दाखवून महिलांकडून कागदपत्रे घेवून त्यांचा गैरवापर करत संगनमातने फसवणूक केल्याचा आरोप या एजंटवर आहे.
या तिघांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. संजय रामचंद्र कलबुर्गी (वय 43) आणि अवधुत दिलीप शिंदे (वय 20) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. याप्रकरणी रुपाली सुनिल गजरे यांनी तक्रार केली आहे.
सागर सत्यनारायण मोदाणी (वय 35), संजय कलबुर्गी आणि अवधुत शिंदे या तिघांनी हुपरी इथे राहणाऱ्या रुपाली गजरे आणि त्यांचा सोबतच्या महिलांना फायनान्स कंपनीकडून व्यवसायासाठी कर्ज मंजूर करुन देतो, असे सांगून संपर्क साधला. त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडील पॅनकार्ड, आधारकार्ड, बॅंकेचं पासबुक इत्यादी कागदपत्रे घेऊन महात्मा गांधी पुतळाजवळील न्यु फ्रेंड मोबाईल शॉपीमध्ये बोलावले.
यावेळी संशयित तिघांनी गजरे यांची कागदपत्रे स्कॅन करुन चार दिवसांनी तुमचं कर्ज मंजूर होईल, असे सांगितले. यानंतर महिलांनी चौकशी केली. मात्र, तुमचे कर्ज मंजूर झाले नाही, असे त्यांना सांगण्यात आले.
दरम्यान, लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर फायनान्स कंपनीचे लोक हप्ता वसुलीसाठी घरी आले. तेव्हा या महिलांना त्यांची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली.