नवी दिल्ली -सार्वजनिक इंधन कंपन्यांनी रविवारच्या विश्रांतीनंतर सोमवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ केली. त्यामुळे लिटरमागे पेट्रोल 5 पैशांनी, तर डिझेल 13 पैशांनी महागले.
दोन्ही इंधनांच्या किमती दररोज बदलण्याच्या धोरणाला 82 दिवस स्थगिती देण्यात आली होती. ती प्रक्रिया सार्वजनिक कंपन्यांनी 7 जूनपासून पुन्हा सुरू केली.
तेव्हापासून 23 दिवसांत पेट्रोलची 21 वेळा, तर डिझेलची 22 वेळा दरवाढ करण्यात आली. त्या दरवाढींमुळे आतापर्यंत पेट्रोल 9 रूपये 17 पैशांनी, तर डिझेल 11 रूपये 14 पैशांनी महागले आहे. संबंधित दरवाढ संपूर्ण देशासाठी लागू आहे.
मात्र, पेट्रोल आणि डिझेलवर प्रत्येक राज्यात स्थानिक विक्री कर किंवा मूल्यवर्धित कराचा (व्हॅट) वेगवेगळा दर आकारला जातो. त्यामुळे राज्याराज्यांत दोन्ही इंधनांचे दर वेगवेगळे आहेत. देशाची राजधानी दिल्लीत तर मागील काही दिवसांपासून प्रथमच डिझेलचा दर पेट्रोलपेक्षा अधिक आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 80 रूपये 43 पैसे, तर डिझेलचा दर 80 रूपये 53 पैसे इतका आहे.