कानपूर : येथील उत्तर प्रदेश सरकारच्या लहान मुलांच्या अनाथाश्रमातील 57 मुलींना करोनाची बाधा झाली. त्यातील पाच मुली या गर्भवती असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चौकशीस सुरवात करण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या अनाथाश्रमात पहिली बाधित 15 जूनला आढळली होती. त्यानंतर दोन दिवसांनी आणखी 33 जणींना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र तरीही जिल्हा प्रशासनाने कर्मचारी अथवा अन्य मुलांना विलगीकरणात तातडीने ठेवले नाही. त्यामुळे जून 19 ला आणखी 16 मुली करोना बाधित झाल्या. या 16 मुली सापडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने हा अनाथाश्रम सील केला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी आठ जण बाधित झाल्या. त्यामुळे बधितांची संख्या 58 वर पोहोचली. त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. करोनाच्या साथीत सोशल डिस्टंन्सिंगची आवश्यकता असताना 100 जणांची क्षमता असणाऱ्या या निवारागृहात 171 मुलींना ठेवण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
कानपूरचे जिल्हाधिकारी ब्रह्मदेव राम तिवारी म्हणाले, या पाच गर्भवती मुली बलकात्काराच्या प्रकरणातील आहेत. त्या आग्रा, इटाह, कनौज, फिरोझाबाद आणि कानपूर येथील आहेत. त्या निवारा गृहात आणण्याआधीच गर्भवती होत्या. यातील दोघींवर शासकीय रुग्णालयात अन्य तीघींवर खासगी रुग्णलयात उपचार सुरू आहेत.