कर्मचाऱ्यांना कमी दिवस काम करण्याचा प्रस्ताव
नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत असलेली एअर इंडिया खर्च कमी करण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करीत आहे. एअर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांना 60 टक्के पगारावर आठवड्यातील तीन दिवस काम करण्याचा पर्याय दिला आहे. ही योजना कंपनीतील स्थायी कर्मचाऱ्यांसाठी आहे.
कमी कालावधीसाठी काम करण्याची योजना एक वर्षासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. एअर इंडिया सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. खाजगी कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी यापेक्षा जास्त कडक उपाययोजना लागू केल्या आहेत. जे कर्मचारी योजना स्वीकारतील त्यांना उरलेल्या काळात इतर विमान कंपन्यात काम करण्याची मुभा नसेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दोन महिन्याच्या लॉकडाऊनंतर 25 मे रोजी भारतातील विमान कंपन्यांची सेवा अंशतः सुरू करण्यात आली असली तरी आंतरराष्ट्रीय सेवा अजूनही बंद आहे. या विमान कंपनीवर 60 हजार कोटी रुपयांचे कर्ज असून कंपनी नफ्यात नाही. दोन वर्षापासून सरकार या कंपनीतील निर्गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्याला अजूनही खऱ्या अर्थाने सुरुवात होऊ शकलेले नाही.