Rahul Gandhi | Prajwal Revanna | Siddaramaiah – जेडीएस पक्षाचे खासदार आणि एनडीएचे कर्नाटकातील उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांनी अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण सध्या संपुर्ण देशभर गाजत आहे. या प्रकरणातील पीडित महिलांना आवश्यक ती सर्व मदत द्या अशी सुचना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून केली आहे.
सिद्धरामय्या यांना लिहिलेल्या पत्रात गांधींनी रेवण्णा यांच्या कृत्यांचा निषेध केला आहे. रेवण्णा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आशीर्वादाने संरक्षण मिळत आहे असेही राहुल गांधींनी म्हटले आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये सतत मौन बाळगणारा असा नेता आपण आत्तापर्यंत कधीच पाहिला नाही असेही राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधताना म्हटले आहे. त्यामुळे आपण पीडित महिलांना सर्वतोपरी मदत करावी अशी विनंती मी आपणास करीत आहे असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
या पीडित महिला न्यायासाठी त्यांची लढाई लढत असताना त्यांना आपण सहानुभूती दर्शवत मदत केली पाहिजे. या गंभीर गुन्ह्यांसाठी जबाबदार असलेल्या सर्वांना कायद्याच्या कचाट्यात आणले जाईल याची खात्री करणे आमचे सामूहिक कर्तव्य आहे,असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
गांधी यांनी आरोप केला की रेवण्णा यांनी शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार केले आणि अनेक वर्षांपासून त्यांचे चित्रीकरण केले.असा भयंकर लैंगिक हिंसाचार करणाऱ्या व्यक्तींना शक्य तितकी कठोर शिक्षा मिळाली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.
एका भाजप नेत्यानेच डिसेंबर २०२३ मध्ये रेवण्णा यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणांची माहिती पत्र लिहून अमित शहा आणि भाजपच्या अन्य नेत्यांना देऊनही त्याची योग्य ती दखल घेतली गेली नाही. उलट पंतप्रधानांनी प्रज्वल रेवण्णा यांचा लोकसभा निवडणूकीत प्रचार केला आणि त्यांना समर्थन दिले हे ऐकून आपल्याला धक्का बसला असेही राहुल गांधींनी म्हटले आहे.