खासगी हॉस्पिटल्सची 80 टक्के जागा करोनाग्रस्तांवर उपचारांसाठी
पुणे – शहरातील करोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जूनमध्ये रुग्ण आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाने खासगी रुग्णालयांचे 80 टक्के बेड ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुण्यात साडेबारा हजार बेड्सची सुविधा उपलब्ध होणार आहे. शासनाने
दि. 21 मे रोजी याबाबतचे आदेश काढले होते. त्यानंतर, महापालिकेने रुग्णालयांकडून ही माहिती मागविली होती. त्यातून ही बाब समोर आली आहे.
शहरात 9 मार्च रोजी पहिला करोनाबाधित आढळला होता. त्यानंतर आता बाधितांची एकूण संख्या 6 हजारांवर गेली असून, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह केसेसची संख्या अडीच हजार आहे. मात्र, शहरातील रुग्णवाढ दुपटीचा वेग लक्षात घेऊन जून अखेरपर्यंत शहरात सुमारे 23 हजार बाधित असतील, तर त्यातील साडेपाच हजार रुग्ण प्रत्यक्षात रुग्णालयात असतील, असा अंदाज महापालिकेने व्यक्त केला आहे.
त्या अनुषंगाने शहरात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा उभारण्यात येत आहेत. मात्र, प्रत्यक्षात उपचारासाठी रुग्णालयाचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि कर्मचारी आवश्यक असल्याने शासनाने 21 मे रोजी राज्यातील खासगी हॉस्पिटलच्या 80 टक्के खाटा कोविडसाठी ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता या रुग्णालयांचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना “मेस्मा’ लागू करण्यात आल्या आहे.
दरम्यान, शासनाने आदेश दिल्यानंतर महापालिकेकडून शहरातील सुमारे 700 खासगी हॉस्पिटलकडून त्यांच्याकडे असलेल्या बेडच्या सुविधेची माहिती मागवण्यात आली होती. त्यानुसार, सुमारे 80 टक्क्यांप्रमाणे 12 हजार 553 बेड पालिकेस लवकरच उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी सर्व खासगी रुग्णालयांशी संपर्क करण्यात आला असून त्यांच्याशी करार करून हे बेड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहीती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.
जिल्ह्यात 55,545 नागरिक परतले
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात (28 मेपर्यंत) एकूण रुग्ण 241, तर बरे झालेले रुग्ण 91 आहेत. एकूण क्रियाशील 143 रुग्ण असून 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नगरपालिका क्षेत्रात एकूण रुग्ण 63 तर बरे झालेले रुग्ण 31 आहेत. क्रियाशील रुग्ण 30 असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागातील 241 रुग्णांपैकी 96 रुग्ण मुंबई येथून तर 70 रुग्ण पुण्यातून आलेले आहेत. नगरपालिका क्षेत्रातील 63 रुग्णांपैकी 47 रुग्ण मुंबई येथून तर 4 रुग्ण पुण्यातून आलेले आहेत. पुणे जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांत इतर जिल्ह्यांतून 55 हजार 545 नागरिक परत आले आहेत. 3 हजार 990 नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले असून 67 हजार नागरिकांचे घरातच विलगीकरण करण्यात आले आहे.