सविंदणे (वार्ताहर) – शिरूर शहरासह तालुक्यात आतापर्यंत 29 जण करोनाबाधित झाले आहेत. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिरूर तालुक्यातील मलठण येथे कोविड सेंटर सुरू करण्याची सूचना उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. मलठण येथील रुग्णालयास मंत्री वळसे-पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
वळसे पाटील म्हणाले की, मलठण येथील कोविड सेंटर सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांनी अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून द्यावा. यावेळी शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचूंदकर पाटील, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे शिरूर उपविभागीय अधिकारी देशमुख, तहसीलदार लैला शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता उज्ज्वला घावटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे, गटविकास अधिकारी अधिकारी बाळासाहेब ढवळे पाटील, औंध रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. नंदापुरकर उपस्थित होते.