आर्थिक संकटातही मिळकतकराचे 127 कोटी रुपये तिजोरीत जमा
पुणे – लॉकडाऊन असतानाही पुणेकरांनी शहराच्या विकासाला हातभार लावण्यासाठी मिळकतकर भरण्यास प्राधान्य दिले आहे. दरवर्षीपेक्षा हे कर भरण्याचे प्रमाण कमी असले तरी, 1 एप्रिल ते 12 मे अखेर पालिकेच्या तिजोरीत मिळकतकरापोटी तब्बल 127 कोटींचा महसूल जमा झाला आहे. या कालावधीत तब्बल 1 लाख 33 हजार 783 जणांनी ऑनलाइन तसेच महापालिकेने काही दिवसांपूर्वी सुरू केलेल्या 27 नागरी सुविधांमध्ये भरला आहे.
ऐन मार्चच्या अखेरीस केंद्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. परिणामी, महापालिकेस आर्थिक वर्षाच्या शेवटच्या काही दिवसांत मिळणाऱ्या कोट्यवधींच्या महसुलावर पाणी सोडावे लागले. त्यातच, नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दीड महिना झाला तरी अद्यापही लॉकडाऊन कायम असल्याने महापालिका प्रशासनाची कोंडी झाली होती. तर मिळकतकराची बिलेही नागरिकांना वाटता न आल्याने पालिकेने ही बिले नागरिकांना ऑनलाइन दिली होती.
मात्र, करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा फटका शहराच्या आर्थिक विकासाला बसणार असल्याने प्रशासनाने दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंत 1 लाख 33 हजार 783 मिळकतधारकांनी तब्बल 127 कोटींचा कर जमा करत आपली बांधिलकी जपली आहे. काही दिवसांपूर्वी पालिकेने कर भरण्यासाठी पुन्हा सुरू केलेल्या नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून गेल्या दोन दिवसांत 4,112 जणांनी 4 कोटी 62 लाखांचा कर ऑनलाइन तर 1,227 मिळकतधारकांनी रोख रक्कम व धनादेशाद्वारे 2 कोटी 2 लाख 2 हजार 295 रुपयांचा महसूल जमा केला आहे.
महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन…
ही नागरी सुविधा केंद्र सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत आणि शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी मिळकतकर भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करसंकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी केले आहे.