पुणे – शहरासह जिल्ह्यात अवघ्या 19 तासांत 12 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर शहरात दिवसभरात 99 नवे बाधित सापडले. आतापर्यंत एकाच दिवशी सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद शुक्रवारी झाली आहे. त्यामुळे पुण्यातील मृतांची संख्या 146 वर गेली आहे.
शहरात आज (दि.8) दिवसभरात नवीन 99 करोनाबाधित सापडले असून, 69 नायडू रूग्णालय, ससूनमध्ये 9 तर खासगी रूग्णालयात 21 बाधित असून शहरातील एकूण संख्या 2 हजार 245 इतकी झाली आहे. शहरात सध्या 1 हजार 377 बाधित उपचार घेत आहेत. त्यातील 76 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 12 जणांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. तर आज दिवसभरात 61 ठणठणीत बरे झाले असून, त्यांना घरी सोडले आहे. त्यामुळे घरी सोडलेल्यांची संख्या 731 इतकी झाली आहे.