अक्षय्य तृतीया खरेदीविनाच; करोनाच्या संकटामुळे सराफीबाजार सुनासुना
पिंपरी – साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या सणाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरेदी आणि पितृपूजन या दोन गोष्टी हमखास या दिवशी केल्या जातात. मात्र यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे सर्वच बाजार बंद असल्यामुळे शहरातील तब्बल दोनशे कोटींच्या उलाढालीवर यंदा पाणी फेरले गेले आहे.
सोने, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक बाजाराला याचा मोठा फटका बसला आहे. दरवर्षी तब्बल सव्वाशे कोटी रुपयांची होणारी सोनेखरेदी यंदा करोनामुळे झालीच नाही. तर काही व्यापाऱ्यांनी ऑनलाइनची सुविधा दिलेली असतानाच दरही 48 हजारांवर पोहोचल्याने ऑनलाइनलाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी पितृपूजन केले जाते. तसेच काहीना-काही नवीन खरेदी करण्यावर भर दिला जातो. “अक्षय्य’ असा हा सण असल्यामुळे गोरगरिबांपासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकजण या दिवशी खरेदी करण्यावर भर देतो. सोने खरेदी हा यातील महत्त्वाचा घटक. आजच्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरातील सोन्याची बाजारपेठ ओसंडून वाहते असा आजपर्यंतचा अनुभव. दरवर्षी किमान सव्वाशे कोटी रुपयांची उलाढाल या बाजारपेठेत होते. याशिवाय चारचाकी व दुचाकी वाहने खरेदीवरही मोठा भर ग्राहकांकडून दिला जातो. वाहन बाजारातही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मोठी उलाढाल पहावयास मिळत होती.
याशिवाय इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवरही शहरवासियांचा भर असायचा. वाहनबाजार आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचीही उलाढाल दरवर्षी 70 ते 100 कोटींपर्यत होत होती. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बाजार बंद असल्यामुळे या सर्वच बाजारात शांतता अनुभवयास मिळाली. तीनही बाजारात कसलीच उलाढाल न झाल्यामुळे अवघ्या एकाच दिवसात तब्बल दोनशे कोटींच्या उलाढालीवर पाणी फेरले गेल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. काही सोने व्यापाऱ्यांनी ऑनलाईन खरेदीची सोय उपलब्ध करून दिली होती. मात्र हातचा गेलेला रोजगार, भविष्याची चिंता, व्यावसायिकांवर असलेले मंदीचे सावट त्यातच दरही 48 हजारांवर पोहोचल्यामुळे ऑनलाईन खरेदीलाही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने सांगण्यात आले. एकूणच अक्षय्य तृतीयेच्या उत्सवावर “करोना’ने पाणी फेरल्याचे पहावयास मिळाले.
ग्राहकांना घरपोच सुविधा
घराबाहेर पडण्यास नागरिकांना असलेला मज्जाव लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी आंब्यासाठी घरपोच सुविधा उपलब्ध करून दिली होती. सहाशे ते पंधराशे रुपये डझन मिळणारा आंबा काहीजणांनी ऑनलाईनही उपलब्ध करून दिला होता. यासाठी आंब्याची छायाचित्रांसह बुकींगसाठी काही क्रमांकही उपलब्ध करून दिले होते. या उपक्रमासही चांगला प्रतिसाद मिळाला. घरपोचसाठी काही ठिकाणी मोफत, तर काही ठिकाणी सर्व्हिसचार्जची आकारणी केली जात होती.
घरातील पूजा उत्साहात
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्या पूर्वजांची पूजा करणे आणि नैवद्य दाखविण्याची परंपरा आहे. या दिवशी घरातील जे पूर्वज मरण पावले आहेत, त्यांची आठवण करून पूजा केली जाते, तसेच गोड नैवद्य दाखविला जातो. घरा-घरात होणारी ही पूजा पार पडली. अनेक ठिकाणी घरगुती पद्धतीने नैवद्य दाखविण्यात आले.