नवी दिल्ली – करोनाचा वाढत प्रभाव आणि प्रसार लक्षात घेत नेपाळ सरकारने 15 मे पर्यंत आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळ पंतप्रधान कार्यालयात सचिव असलेले नारायण बिदारी यांनी शनिवारी याबाबत अधिकृत घोषणा केली. नेपाळमध्ये बाधितांची संख्या 48 च्या पुढे गेली आहे.
साथरोगाच्या संकटात नेपाळला योग्य वेळी आरोग्य सेवा आणि इतर महत्त्वाच्या वैद्यकीय साधनांचा पुरवठा केल्याबद्दल नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी पंतप्रधान नरेंद मोदींचे आणि भारत सरकारचे आभार मानले. भारताकडून पाठविलेले हे साहित्य नेपाळला 22 एप्रिल रोजी पोहोचले. विशेष विमानाने हे साहित्य पोहोचविण्यात आले.
या संदर्भात पंतप्रधान के. पी. शर्मा ओली ट्विटरद्वारे म्हणाले, नेपाळला 23 टन वैद्यकीय साधनांचा पुरवठा केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद मोदींचे आभार मानतो. यावर मोदी म्हणाले, भारत-नेपाळचे संबंध विशेष आहेत. आपले अनुबंध मजबूत आणि सुदृढ आहेत कोरोना संकटात भारत नेपाळ सरकार आणि जनतेच्या पाठीशी आहे.