पालिकेच्या नोंदणी विभागाचा उपक्रम
पुणे – लॉकडाऊनमुळे शहरात संचार बंदी असल्याने तसेच महापालिकेची नागरी सुविधा केंद्र बंद असल्याने नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना तातडीने दाखले हवे आहेत, अशा नागरिकांना पालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाकडून ई-मेलवर दाखल्याची प्रत पाठविण्यात येणार आहे. महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी ही माहिती दिली.
महापालिकेची शहरातील नागरी सुविधा केंद्र 31 मार्चपर्यंत मिळकत कर स्वीकारण्यासाठी सुरू होती. मात्र, 31 मार्च रोजी या नागरी सुविधा केंद्राचा करार संपुष्टात आला आहे. त्यामुळे ही केंद्र आता लॉकडाऊन संपेपर्यंत बंदच राहणार आहेत. त्यातच, अनेक नागरिकांकडून जन्म आणि मृत्यू दाखल्याची मागणी करण्यात येत आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर शाळा तसेच इतर शासकीय कामकाज सुरू झाल्यास तातडीनं या दाखल्याची गरज असणार असल्याने नागरिक आता पासूनच दाखले मागणी करत आहेत. हे दाखले तयार आहेत.
मात्र, पालिकेस ते नागरिकांना लॉकडाऊनमुळे देता येत नाहीत. त्यामुळे जे नागरिक वारंवार दाखले मागणी करत आहेत त्यांना ई-मेलद्वारे दाखले दिले जात आहेत. दिवसाला पाच ते सहा ई-मेल येत असून जे दाखले तयार आहेत, त्याची पहिली मोफत प्रत संबधित आवश्यक माहिती व कागदपत्रे ई-मेल वर उपलब्ध करून दिल्यानंतर दाखला क्रमांक आणि प्रत पाठविण्यात येत आहे. नागरिकांनी दाखल्यासाठी ई- मेलवर आवश्यक माहिती पाठवावी त्यानंतर दाखला प्रत आणि दाखला क्रमांक दिला जाईल.