जुन्नर -शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शिवनेरवाडी (कुसुर) येथील शेतकऱ्याच्या गोठ्यातील एका वासरावर सकाळी तर दुसऱ्या वासरावर सायंकाळी हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. 21) घडली. या हल्ल्यात दोन्ही वासरांचा मृत्यू झाला आहे. तर खबरदारीचे उपाय म्हणून वनविभागाने बुधवारी (दि. 22) सायंकाळी येथे पिंजरा लावला असून घटनेचा पंचनामा केला आहे.
एकाच दिवसात या गोठ्यात दोन वेळा बिबट्याने हल्ला केला असून एक वर्षाची कालवड पहाटेच्या हल्ल्यात जागीत गतप्राण झाली. तर सहा महिन्यांची कालवड सायंकाळी झालेल्या हल्ल्यात ठार झाल्याचे शेतकरी समीर हुंडारे यांनी सांगितले. किल्ले शिवनेरीच्या या परिसरात काही दिवसांपूर्वी मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला होता.
न्हावरेत शेळीच्या कळपावर हल्ला
न्हावरे – येथे तांबेवस्ती येथे मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केल्याने शेळी जखमी झाली. तर, पाळीव कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडला. बुधवारी (दि. 23) रात्री अकराच्या दरम्यान ही घटना घडली आहे. यात व्यवसायिक अविनाश शिवाजी तांबे यांचे नुकसान झाले असून त्यांनी बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी केली आहे.