मुंबई : लॉकडाऊनच्या काळात प्रदूषण कमी आणि हवेच्या शुद्धतेत झालेली वाढ ही काही प्रमाणात चांगली ठरली आहे. कारण मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात दरवर्षी फ्लेमिंगो म्हणजे रोहित पक्ष्यांचे आगमन होते, पण यावर्षी या पक्षांचे आगमन उशीरानं झाले. पण आनंदाची बाब म्हणजे अशी की लॉकडाऊनच्या काळात येथे येणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत ही २५% नी वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
बॉम्बे नॅच्युरल हिस्ट्री सोसायटीने दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि महानगर परिसरात गतवर्षांचा तुलनेत यंदा २५% अधिक रोहित पक्षी पाहायला मिळाले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व बंद आहे, माणसांचा वावर, प्रदूषण नसल्याने रोहित पक्ष्यांसाठी सध्याचे वातावरण हे अनुकूल आहे, अशी माहिती बॉम्बे नॅच्युरल हिस्ट्री सोसायटीने दिली.
शिवडी, ठाणे खाडी परिसर, एनआरआय कॉलनी, सीवूड्स, टीएस चाणक्य या नवी मुंबई परिसरातही रोहित पक्षी मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहेत. या परिसरात अनेक बांधकामं सुरु आहेत मात्र लॉकडाऊनमुळे परिसरात शांतता आहे, इथे दरवर्षी येणारे रोहित पक्षी पाहता सीवूड्स परिसराला रोहित पक्षी अभयारण्य घोषीत करावे, असेही बॉम्बे नॅच्युरल हिस्ट्री सोसायटीने म्हटले आहे.
लॉकडाऊनमुळे सगळीकडे शांतता आहे, यांना अन्नही सहज उपलब्ध होत आहे, जानेवारीत मुंबई महानगर क्षेत्रात रोहित पक्ष्यांची संख्या ही ३३ हजार ३३४ इतकी होती आता हिच संख्या फेब्रुवारी महिन्यात १ लाखांवर पोहोचली आहे. जानेवारीत रोहित पक्ष्यांची संख्या कमी होती मात्र एप्रिलमध्ये ही संख्या वाढली आहे अशीही माहिती बॉम्बे नॅच्युरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक दिपक आपटे यांनी दिली.