शेवगाव – परदेशी नागरिकांच्या संपर्कात आलेल्या अमरापूर व शेवगाव येथील करोना निदान तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविलेल्या 18 संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्या सर्वाना आता खबरदारीचा उपाय म्हणून येथील आयुर्वेद रूग्णालयात 14 दिवस वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली क्वारंटाईन करण्यात आले आहे.
अमरापूर व शेवगाव येथील जमातीमध्ये परदेशातून आलेल्या काही व्यक्ती वास्तव्यास होत्या. ही माहिती उघड झाल्यावर शुक्रवारी (दि.3 ) प्रशासनाने राबविलेल्या शोध मोहिमेत अमरापूर येथे अरब, जिबुटी (आफ्रीका) देशातून आलेल्या 10 व राज्यातील 2 भाषांतरकार यांच्या संपर्कात आलेल्या
4 व्यक्ती तसेच शेवगाव शहरात जमातीत परदेशातील काही व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 4 अशा 18 व्यक्तींना करोना निदान करण्यासाठी स्वतंत्र एस.टी. बसमधून नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले होते. तेथे त्यांची तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविण्यात आला होता. त्या अहवालात संबंधितांना करोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना परत आज शेवगावी आणण्यात आले आहे.
शेवगावात विलगीकरण वार्ड सज्ज
करोना संशयितांच्या विलगीकरणासाठी आता शेवगावातच सर्व सुविधांनी युक्त अशा पन्नास खाटांचे विलगीकरण वार्ड सज्ज करण्यात आला आहे. यासाठी तहसीलदार भानुदास गुंजाळ, ग्रामिण आरोग्य केंद्राचे अधिक्षक डॉ. रामेश्वर काटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी पाठपुरावा केला. तर प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त सचिव डॉ. राजेंद्र विखे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शेवगाव विभागाचे कार्यकारी अधिकारी डॉ. युवराज नरवडे पाटील व प्राचार्य डॉ . भागवत शिंदे यांनी अतिशय तत्परतेने हा विलगीकरण वार्ड सज्ज केला आहे . त्यामुळे तालुक्यातील संशयितांच्या विलगीकरणाची सोय झाली आहे.