कोल्हापूर -कोल्हापुरात आणखी एक महिला करोनाबाधित असल्याचे सोमवारी निष्पन्न झाले आहे. ही महिला काही दिवसांपूर्वी साताऱ्यातून कोल्हापूरला आली होती. आता जिल्ह्यातील करोना संक्रमित रुग्णांची संख्या तीन वर गेली आहे.
कसबा बावडा येथील 63 वर्षीय महिलेचा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नव्हता. मात्र, आज नवा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिला कसबा बावड्यातील मराठा कॉलनीतील आहे. या महिलेचा अहवाल सीपीआर प्रशासनाकडे आला असून ती काही दिवसांपूर्वीच साताऱ्याहून कोल्हापुरात आल्याची प्राथमिक माहिती आहे. भक्तिपूजानगरनंतर कसबा बावड्यात करोनाचा रुग्ण आढळल्याने कोल्हापूरकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कसबा बावडा येथे राहणारी ही महिला 20 व 21 मार्च रोजी सातारा येथे गेली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 22 मार्चला ती कोरेगाव तालुक्यातील बनवडी येथे गेली होती. 28 मार्चला ती कोल्हापूरमध्ये परत आली होती. तिला सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे 30 मार्चला दिसून आली. दुसऱ्याच दिवशी 31 मार्चला खासगी रुग्णालयात तिने उपचार घेतले होते. 3 एप्रिल रोजी बावड्यातील सेवा रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीपीआरमध्ये दाखल करून तिच्या घशातील स्रावांचा नमुना प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या दरम्यान तिच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.