नायडू रुग्णालयात एक, ससूनमध्ये 4 जण दाखल; पुणे शहरातील बाधितांची संख्या 50
पुणे – दिवसभरात नायडू रुग्णालयात एक तर, ससून रुग्णालयात 4 असे एकूण 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्व बाधित व्यक्ती शहाराच्या मध्यवस्ती भागात राहणारे असून, पुणे शहरातील बाधितांची संख्या 50 झाली आहे. तर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात मिळून 82 करोना रुग्णसंख्या झाली आहे.
नायडू आणि ससून रुग्णालयासह अन्य खासगी रुग्णालयांत एकूण 55 करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये नायडू रुग्णालयात 35, ससून रुग्णालयात 9 तर, अन्य खासगी रुग्णालयांत 11 जणांचा समावेश आहे. त्यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून, अजूनही 84 जणांचे नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तर, ससून रुग्णालयातील 32 जणांचे नमुने तपासणी अहवाल संध्याकाळपर्यंत येईल, अशी माहिती आरोग्य विभागाडून देण्यात आली.
आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या 1,259 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 1,117 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. 128 जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले असून उपचार सुरू आहेत. तर 10 जणांना आतापर्यंत घरी सोडले आहे. दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत, अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.