नारायणगाव – नारायणगाव (ता. जुन्नर) येथील दिल्ली येथे गेलेल्या मुस्लीम समाजातील पाच जणांना आज (दि. 4) ससून रुग्णालयातून नायडू हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेले आहे.
या कुटुंबातील दोघांची तपासणी करणारे जुन्नरचे खासगी हॉस्पिटलला सील करून डॉक्टरांना होम क्वारंटाइनचा सल्ला दिल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे व जुन्नर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी दिली.
कोल्हेमळा रोडवरील एका सोसायटीमध्ये राहत असलेल्या 5 जणांनी दिल्ली येथील निजामुद्दीन दर्गाचे 17 मार्चला दर्शन घेऊन आग्रा येथून रेल्वेने नाशिक येथे 22 मार्चला येऊन तेथून नारायणगावला आले होते.
ही माहिती नारायणगाव पोलिसांना कळताच पोलिसांनी आरोग्य विभागाच्या माध्यमातून शुक्रवारी (दि. 3) या कुटुंबातील दोन पुरुष, दोन महिला आणि एक छोटी मुलगी यांना वारुळवाडी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी पुढील तपासणीसाठी पुणे येथील नायडू हॉस्पिटल येथे पाठविले होते.प्रथम ससून रुग्णालयात त्यांची रक्त तपासणी आणि एक्स-रे, अन्य तपासण्याल्यानंतर त्यांना सकाळी नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
या सर्वांचा करोना टेस्टचा रिपोर्ट अद्याप प्राप्त झाले नाहीत. हे कुटुंब 22 मार्चला नारायणगाव येथे आले आहे. गावात आल्यानंतर कोणाच्या सान्निध्यात आले होते, याचा तपास पोलीस व आरोग्य विभाग करीत आहे.
या पाच जणांपैकी एका महिलेला ताप तर एक व्यक्तीला खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी 28 मार्चला 2020 जुन्नर येथील खाजगी डॉक्टरकडे औषधोपचार घेतले होते, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे व जुन्नरचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी दिली.