मोठ्या अडचणीला सामारे जाण्यास तयार राहा – ट्रम्प
वॉशिंग्टन – अमेरिकेसाठी पुढील दोन आठवडे अत्यंत कठीण असणार असून त्यासाठी निर्माण होणाऱ्या समस्येचा सामना करण्यास सज्ज राहा अशी सुचना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या देशातील नागरिकांना केली आहे. येत्या पंधरा दिवसांत अमेरिकेत किमान एक ते दोन लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो असे भाकीत व्हाईट हाऊसने या आधीच केले आहे. दरम्यान काल दिवसभरात अमेरिकेत 23 हजार नवीन करोनाग्रस्त आढळले असून तेथील करोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 88 हजारांवर गेली आहे. तर मृतांची संख्या 4 हजार 56 इतकी झाली आहे.
करोनाच्या संबंधात व्हाईट हाऊसमध्ये नेमण्यात आलेल्या टास्कफोर्सचे एक सदस्य देबोराह बिक्स यांनी सांगितले की, येत्या पंधरा दिवसांत अमेरिकेत किमान एक ते दोन लाख लोकांचे प्राण जाऊ शकतात. अमेरिकेने या अनुषंगाने जी उपाययोजना केली आहे ती जर केली गेली नसती तर अमेरिकेतील मृतांचे प्रमाण 15 ते 22 लाखांपर्यंत गेले असते, असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेने आता अत्यंत कठीण काळाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध राहिले पाहिजे, असे ट्रम्प यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, दोन आठवड्यानंतर आपल्याला बाहेर पडण्यासाठीचा प्रकाश दिसू शकेल पण हे दोन आठवडे आपल्यासाठी अत्यंत अत्यंत कठीण असणार आहेत.