शहरात सर्वत्र कडक नाकाबंदी; विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त
डिजिटल पासची काटेकोर अंमलबजावणी
पुणे – करोनामुळे शहरात संचारबंदीचा आदेश असल्यामुळे पोलिसांकडून नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन केले जात आहे. तरीही काही नागरिक शहरामध्ये विनाकारण फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. आता, शहरात विनाकारण फिरणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून ड्रोनचा वापर होत असून त्यामध्ये दिसणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. दरम्यान, मंगळवारी रात्रीपासून शहरात कडेकोट नाकाबंदी केली आहे. डिजिटल पास असल्याशिवाय सोडले जात नव्हते. विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त केली आहेत.
करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी 9 मार्चपासून जिल्हा, आरोग्य, महापालिका व पोलीस प्रशासन एकत्रित काम करीत आहे. संचारबंदी लागू झाल्यापासून नागरिकांनी विनाकारण शहरामध्ये फिरू नये, यासाठी पोलिसांकडून शहरात 180 हून अधिक ठिकाणी नाकेबंदी केली आहे. तसेच, नागरिकांना शहरामध्ये न फिरण्याबाबत सातत्याने आवाहन केले जात आहे. विशेषत: पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या 300 पेक्षा जास्त नागरिकांवर संचारबंदी उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. असे असूनही नागरिक शहरामध्ये फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
ड्रोनचा वापर करून टेहळणी
शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठा येणाऱ्या परिमंडळ एकमध्ये सोमवारी ड्रोनचा वापर करून टेहळणी करण्यात आली. तर मंगळवारी येरवडा, औंध, बाणेर, वडगावशेरी हा परिसर असणाऱ्या परिमंडळ 4, हडपसर, वानवडी, कोंढवा परिसर असलेल्या परिमंडळ 5 या परिसरामध्ये ड्रोनचा वापर करून टेहळणी करण्यात आली. त्यामध्ये निदर्शनास आलेल्या नागरिकांवर कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे.
संचारबंदी असतानाही नागरिक रस्त्यावर फिरत आहेत. त्यांना अटकाव करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. ड्रोन फिरत असताना त्यामध्ये निदर्शनास येणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. परिमंडळ 1, 4 व 5 मध्ये ड्रोनचा वापर केला आहे.
– डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त