पुणे : देशभरात लॉकडाऊन सुरू असला तरी शासकीय कार्यालये सुरू आहेत. तर राज्यशासनाने शासकीय कार्यालयात दररोज 5 टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, मंगळवारी सकाळी कामावर निघालेल्या महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील क्लार्कला पोलिसांकडून काठीने मारहाण करण्यात आली.
ज्ञानेश्वर पादुका चौकात हा प्रकार घडला असून, पालिकेचे ओळखपत्र दाखविण्यात आल्यानंतरही या कर्मचाऱ्यास मारण्यात आले आहे. रमेश ढोकळे असे या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. दरम्यान, या वेळी पोलिसांनी काठीने मारल्याने त्यांच्या पाठीवर तसेच खांद्यावर गंभीर मार लागला आहे. तर या प्रकारची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.