राज्य शासनाचे सर्वच शाळांना आदेश
पुणे – करोना विषाणू संसर्गामुळे राज्यात संचारबंदी असताना काही शाळांकडून पालकांकडे शुल्काची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संचारबंदीच्या काळात पालकांकडून शुल्क भरण्याची सक्ती करू नये, असा स्पष्ट आदेश राज्य शासनाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आला आहे.
करोना संसर्ग टाळण्यासाठी केंद्र शासनाकडून देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असताना काही शाळांकडून शैक्षणिक वर्ष 2019-20 आणि 2020-21 साठी शुल्क भरण्याची मागणी पालकांकडे केली जात आहे. करोना साथीची सध्याची परिस्थिती, नागरिकांना घराबाहेर पडण्यास असलेली बंदी आणि पैशांची उपलब्धतता यांचा विचार करून शाळांनी सहानुभूती दाखवावी.
संचारबंदीच्या काळात शुल्क भरण्याची सक्ती पालकांवर करण्यात येऊ नये, संचारबंदीचा काळ संपल्यानंतर शुल्क भरण्याची सूचना संबंधित पालकांना द्यावी, असे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.