इस्लामपुरातील प्रकार
सांगली – सांगलीत जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील 25 जणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले असून ही बाब आता साऱ्या देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. तथापि हे कुटुंब अत्यंत छोट्या जागेत राहत असल्यानेच एकमेकांच्या निकट संपर्कामुळे त्या सर्वांना करोनाची बाधा झाली आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुरुवातीला सौदी अरेबियातून आलेले या कुटुंबातील चौघेजण करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यांची 23 मार्च रोजी चाचणी घेण्यात आली त्यात ते करोना बाधित असल्याचे आढळून आले. त्यानंतर आठवडाभराच्या अवधीत त्यांच्या कुटुंबातील 21 जणांनाही या रोगाने ग्रासले. त्यात एका दोन वर्षाच्या बालकाचाहीं समावेश आहे.
तथापी या इसमांकडून समाजात अन्यत्र या रोगाची लागण झाल्याचे आढळून आलेले नाही केवळ एकमेकांच्या निकट संपर्कात राहिल्यानेच हे लोक बाधित झाल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. हे कुटुंबीय इस्लामपुरातील रहिवासी आहेत आणि ते लोक एका अपुऱ्या घरात एकत्र राहात असल्यानेच तेथे ही समस्या उद्भवली. हे सर्व जण एकमेकांचे नातेवाईकच असून ते अगदी शेजारीशेजरीच राहतात. हे सर्व लोक चोवीस तास एकमेकांशी संपर्कात असल्यानेच त्या सर्वांनाच याची बाधा झाली आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, या कुटुंबातील काही जणांना करोनाची बाधा झाल्यानंतर आम्ही सर्वांनाच चाचणीसाठी दाखल करून घेतल्याने करोनाच्या प्राथमिक अवस्थेतच त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यामुळे कुटुंबीयांना फार गंभीर स्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता कमी आहे असेही सांगण्यात येत आहे. हे रुग्ण वेळीच लक्षात आल्याने त्याच्या प्रसारालाही अटकाव घालण्यात आला ही एक चांगली बाब झाली असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
या कुटुंबातील जे चार जण सौदी अरेबियातून आले आहेत ते 12 मार्चला मुंबईत आले होते. त्यावेळी मुंबईत विदेशी नागरिकांच्या स्टॅम्पिंगचे काम सुरू झाले नव्हते. स्थानिक प्रशासनाच्या तपासणीत 18 मार्च रोजी हे रुग्ण आढळून आले. आता हे लोक ज्या ठिकाणी राहात होते त्याच्या एक किलोमिटरचा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला असून त्यांच्या जवळ वावरणाऱ्या 325 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.