करोनाबाबत जनजागृतीचा प्रयत्न : नेटिझन्सनी दिली दाद
पुणे – “एक देश हा.. एक भावना.. तोडू साखळी.. रोखू करोना..’ हे एका पोलीस गायकाचे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर विविध माध्यमांतून नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. कलाकारांसह आता पोलीस देखील गीतातून प्रबोधन करत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका पोलीस कर्मचाऱ्यांने गायलेले “जिंदगी मौत ना बन जाए, संभालो यारों’ हे गाणेदेखील व्हायरल झाले होते. लॉकडाउन असताना नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे.
मात्र, याला न जुमानता अनेकजण फिरत आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांमध्ये पोलिसांनी जागृती केली. प्रसंगी काठीचा बडगा उगारून चोप देखील दिला. मात्र, काही महाभाग क्षुल्लक कारणे देत गर्दी करत आहेत. यावर आता पुणे पोलिसांनी गाण्यातून नागरिकांचे प्रबोधन करण्याचा पर्याय निवडला आहे. याबाबतचा व्हिडिओ दैनिक “प्रभात’च्या संकेतस्थळ आणि सोशल मीडियावर प्रसारित केला आहे.
दत्तवाडी पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार प्रमोद कळमकर यांनी या गाण्याचे लेखन आणि गायन केले आहे. याद्वारे करोनाबाबत जनजागृती करून नागरिकांना घरामध्ये थांबण्याचे आवाहन केले आहे. “लगान’ या चित्रपटातील “चले चलो’ या गीताच्या निवडीला अनेकांनी पसंती दर्शवली असून, नेटिझन्सकडून कळमकर यांचे कौतुक होत आहे.
दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांची ही संकल्पना होती. तर सहायक पोलीस निरीक्षक सुरेंद्र धुमाळे, पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत सप्ताळे, मनोज अभंग, पोलीस हवालदार श्रीकांत शिरोळे, रेवणनाथ देवकर, आदिनाथ देवकर, मीरा वाकोडे यांचा देखील यामध्ये सहभाग होता. यापूर्वीदेखील दत्तवाडी पोलिसांनी ऑडिओ क्लिपद्वारे करोनाबाबत प्रबोधन केले होते.
मी हौशी गायक कलाकार आहे. वेळ मिळाला की लेखन करतो. अनेक नागरिकांमध्ये करोनाचे गांभीर्य कमी आहे. करोनाची साखळी तोडणे सध्या आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी घरामध्ये राहणे आवश्यक आहे. त्यामुळे गाणे तयार करुन त्यातून प्रबोधन करण्याचे ठरवले. यासाठी आम्ही एक ट्रॅक तयार केला आहे.
– प्रमोद कळमकर, सहायक फौजदार तथा गायक