लोणंद -करोनामुळे जिल्ह्यासह राज्य व देशात संचार बंदी लागू आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणालाही पेट्रोल, डिझेल विक्री करु नये, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. मात्र प्रशासनाचे हे आदेश पायदळी तुडवत तरडगाव येथील पेट्रोल पंपावर खुलेआम पेट्रोल, डिझेल विक्री सुरु आहे.
लोणंद तरडगाव रोडवर तरडगावच्या हद्दीतील इंडियन ऑइल कंपनीचा पेट्रोल पंप आहे. गुरुवार, 26 रोजी सकाळच्या सुमारास या पंपावर खुलेआम सरसकट सर्वांसाठीच पेट्रोलची विक्री चालू असल्याचे समजताच परिसरातील दुचाकी, चारचाकी वाहनांची पेट्रोल भरून घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली. शासनाने घातलेले निर्बंध झुगारून सर्रासपणे ही विक्री केली जात होती.
यावेळी पंपावर एवढी गर्दी होती की चार रांगा करूनही पंपाच्या बाहेर मुख्य रस्त्यावर मोठ्या रांगा पेट्रोल भरून घेण्यासाठी लागलेल्या होत्या. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंपावर चाललेली विक्री बंद केली. मात्र तोपर्यंत तिथे जणूकाही यात्रेप्रमाणे गर्दी जमलेली होती. करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य व देश पातळीवर कठोर निर्णय घेतले जात असताना ग्रामीण भागात अशा प्रकारे सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी केली जात आहे.