बारामती – करोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरातील जळोची येथे गेलेल्या पोलीस पथकावर काहींनी हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह नऊ पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संचारबंदी असतानादेखील अशा प्रकारची घटना घडल्याने बारामतीत खळबळ उडाली. या घटनेनंतर राज्य राखीव दलाची एक पोलीस तुकडी जळोची येथे दाखल झाली आहे.
होम क्वारंटाइन असलेल्या लोकांना बाहेर फिरू देऊ नये, असे सांगणाऱ्या युवकाला काही जणांनी मारहाण केल्यानंतर पोलिसांचे पथक जळोची येथे पोहोचले. मात्र काहींनी पोलिसांनाच मारहाण केली. त्यामध्ये पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह तीन अधिकारी व सहा कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांना काठ्या व दगडांनी मारहाण करण्यात आली त्यामध्ये काही
पोलिसांना डोक्याला तर काहींच्या हाताला मार लागला आहे. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे, फौजदार पद्मराज गंपले व योगेश शेलार, पोलीस कर्मचारी पोपट कोकाटे, सिद्धेश पाटील, पोपट नाळे, महिला पोलीस कर्मचारी रचना काळे व स्वाती काजळे असे एकूण नऊजण या हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत.
वृद्धेचा मृत्यू झाल्याची उठवली अफवा
पोलिसांच्या मारहाणीत वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारचा बनाव करत महिलांनी देखील पोलिसांवर हल्ला केला. येथील तरुणांनी देखील दगडांचा वापर करत पोलिसांना मारहाण केली. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.