सामूहिक प्रयत्नांचे पंतप्रधानांचे “सार्क’ नेत्यांना आवाहन
नवी दिल्ली : करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी एकत्रितपणे यशस्वी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्क देशांनी एकत्रित तयारी करावी आणि एकत्र काम केले पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.
करोनाला रोखण्यासाठी सामूहिक धोरण निश्चित करण्यासाठी आज “सार्क’देशांच्या प्रमुखांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. त्यावेळी बोलताना पंतप्रधानांनी हे आवाहन केले.
करोना विषाणूच्या साथीला रोखण्यासाठी “सार्क’देशांनी स्वयंप्रेरणेने आपत्कालिन निधी उभारायला हवा, असे सांगून या निधीसाठी भारताकडून 1 कोटी डॉलर देण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली.
डॉक्टरांची आणि तज्ञांची एक रॅपिड रिस्पॉन्स टीम भारत उभी करीत आहे, तसेच चाचण्या आणि इतर उपकरणेही उपलब्ध आहे. हे सर्व साहित्य आवश्यकता भासल्यास “सार्क’देशांसाठी राखीव साहित्य म्हणून उपलब्ध करून दिले जाईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
भविष्यात परिस्थिती कशी बदलेल हे सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे आपला दृष्टीकोन मांडणे हे महत्वाचेच असेल. “सार्क’देशांमध्ये करोना विषाणूची लागण झालेले 150 रुग्ण आहेत. ही संख्या अन्य देशांच्या तुलनेत कमी आहे.
मात्र याच भागात जगातील एक पंचमांश लोकसंख्या असल्याने आपल्याला सतर्क राहावे लागेल, असे पंतप्रधान म्हणाले.
करोनाच्या प्रतिकाराच्या भारताच्या अनुभवाबाबत बोलताना “तयार पण घाबरू नका हा एक मार्गदर्शक मंत्र आहे.’ असे पंतप्रधान म्हणाले. भारताने या समस्येला कमी लेखलेले नाही.
पण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जोरदार प्रतिक्रिया दिली. टप्प्याटप्प्याने केलेल्या उपाय योजनांमुळे घबराट निर्माण होत नाही. टिव्ही, सोशल मिडीयाच्या माध्यमातून केलेल्या सार्वजनिक जनजागृतीद्वारे असुरक्षित गटांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. जगभरातील 1,400 भारतीयांना मायदेशी आणले गेले.
अशीच मदत शेजारी देशांना करण्यासाठीही भारत तयार असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. करोनाबाबत आपत्कालिन निधी स्थापण्याच्या मोदींच्या सूचनेचे मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी स्वागत केले.
तर प्रादेशिक देशांना किटची ाचणी करण्यासारखी मदत दिल्याबद्दल श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशर्रफ घनी यांनी पुढील महिन्यांत परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याची सूचना केली.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली, भूतानचे पंतप्रधान डॉ. लोटय शेरिंग आणि पाकिस्तानचे आरोग्यमंत्री डॉ. जफर मिर्झा यांनीही या प्रसंगी करोनाला रोखण्यबाबतच्या सामूहिक प्रयत्नांबाबत सहमती दर्शवली.