पुणे – “रॉ’चा एजंट असल्याचे सांगत शस्त्रसाठ्याची माहिती देण्यासाठी एक तोतया कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. मात्र, कोंढवा पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून त्याची बनवेगिरी सुटली नाही. कोंढवा पोलिसांनी थेट “आयबी’च्या अधिकाऱ्यांना कॉल करत खातरजमा केली. तेव्हा तो तोतया असल्याचे लक्षात आले. यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवताच तो बिहारमधील एका खुनाच्या गुन्ह्यात फरार असल्याचे उघड झाले. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला; तर बिहार पोलीस खुनाच्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेण्यासाठी पुण्यात दाखल होत आहेत.
सोनु सूरज तिवारी (वय 26, रा. कोंढवा बुद्रुक, मुळ. बिहार) असे अटक झालेल्या तोतया रॉ एजंटचे नाव आहे. तो स्वत:ला बिहारमधील ऍडिशनल एसपी असल्याचे सांगून “रॉ’साठी काम करत असल्याचे भासवत होता. याप्रकरणी पोलीस नाईक अमोल फडतरे यांनी फिर्याद दिली आहे.
सोनु तिवारी शनिवारी दुपारी कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल झाला. तेथे त्याने मोठ्या रुबाबात “रॉ’चा एजंट असल्याचे सांगितले. बिहारमधून मोठा शस्त्रसाठा कोंढवा परिसरात येणार आहे. हे ऑपरेशन आपल्याला मिळून करायचे आहे, असे त्याने सांगितले. सोनुला पोलिसांनी ओळखपत्र विचारले असता, त्याने आपण ते जवळ ठेवत नसल्याचे सांगितले. यामुळे पोलिसांना थोडा संशय आला. त्याला शस्त्रसाठा कोठे येणार याची माहिती विचारल्यावर उत्तरात विसंगती आढळली. यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी आयबीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी या नावाचा कोणताच अधिकारी नसल्याचे सांगितले. यावर कोंढवा पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पोलिसी हिसका दाखवला. यानंतर तो पोपटासारका बोलू लागला.
सोनु तिवारी हा मूळचा बिहारमधील असून, गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरात राहत आहे. बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील कासमा गावचा आहे. वादविवादातून त्याने तेथे आका नावाच्या व्यक्तीचा खून केला. त्यानंतर तो पुण्यात आला होता.
– विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा