प्रभाग क्रमांक 4 मधील नागरी समस्या सोडविण्याची मागणी
नगर – भिंगार येथील प्रभाग क्रमांक 4 च्या नागरी समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने छावणी परिषदेवर मोर्चा काढून मुख्यकार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना घेराव घालण्यात आला.
राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात तस्लीम मतीन सय्यद, आवेज शेख, माया साठे, मंदा होडगे, अकील शेख, मोबीन शेख, आत्तार शेख, अमीन आत्तार, लियाकत शेख, आवेस पठाण, अय्युब बेग, इरफान शेख आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रभाग क्रमांक 4 मध्ये नागरी समस्यांचा बोजवारा उडाला असून, छावणी परिषद आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. शौचालय असून देखील दुरावस्था व परिसरात असलेली दुर्गंधीचा नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शौचलयाच्या देखरेखसाठी नेमलेला वॉचमन सकाळी 10 वाजता शौचालय बंद करुन सायंकाळी 5 वाजता उघडत असल्याने, मध्यंतरी काळात नागरिकांना शौचालयास जाता येत नाही. तसेच सदर शौचालय महिन्यातून 8 ते 10 दिवस बंद असते.
शौचालय बंद असल्याने नागरिकांना उघड्यावर बसण्याची वेळ येत आहे. तसेच गटारी तंबुलेल्या असून, दुषित पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे या भागात साथीचे आजार पसरत आहे. कचरा संकलन करणारी घंटा गाडी नाही, पिण्याच्या पाण्याचे गंजलेले नळ, जुनी जीर्ण झालेली पाईपलाइन, सफाई कर्मचारी सफाईसाठी येत नाही, पथदिवे बंद अवस्थेत आहे. हे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना धारेवर धरले.