कराड – कराडकडून सोनसळकडे निघालेल्या भरधाव जीपने 31 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने त्यावरील इम्तियाज पापा मुलाणी (वय 45, रा. चिंचणी, ता. कडेगाव, जि. सांगली) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर जीप रस्त्याकडेला उलटून त्यामधील पाच जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी जीपचालक विश्वनाथ शंकर पाटसुपे (वय 20, रा. संजयनगर, शेणोली) याच्यावर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराडहून सोनसळकडे जाणाऱ्या घाटात 31 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भरधाव जीपने (एमएच-14-बी-3511) पुढे निघालेल्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीस्वार इम्तियाज मुलाणी हे रस्त्याकडेला पडून गंभीर जखमी झाले होते. त्यांना परिसरातील नागरिकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, दुचाकीला धडक दिल्यानंतर चालक विश्वनाथ तुपे याचा जीपवरील ताबा सुटला. त्यामुळे जीप काही क्षणातच उलटली.