भाजपचे ज्येष्ठ एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई : भाजपाचे राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्याविरोधातील नाराजी पहिल्यांदाच समोर आली आहे. स्वतःच्या राजकारणासाठी फडणवीस आणि महाजन यांनी मला तिकीट मिळू दिले नाही. त्यामुळेच माझे तिकीट कापण्यात आले, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे. खडसे यांनी पक्षाच्या राज्यातील नेतृत्वावर अनेक आरोप केले आहेत.
राज्याच्या सत्तेतून पायउतार व्हाव्या लागलेल्या भाजपात आता नाराजीचा सूर अधिक गडद होऊ लागला आहे. आतापर्यंत नाव न घेता टीका करणारे भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचे नाव घेत टीका केली आहे. एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपाच्या आजच्या स्थितीला राज्यातील नेतृत्वाला जबाबदार धरले आहे.
खडसे यांनी तिकीट कापण्यामागे फडणवीस आणि महाजन यांचा हात असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीस यांनी आपल्याविषयी नाराजी व्यक्त केली. फडणवीस आणि महाजन यांनी मला तिकीट देण्यास पक्षश्रेष्ठींकडे विरोध केला. त्यावर आम्ही विचार करून निर्णय घेऊ असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले होते. पण, तिकीट कापण्यात आले. कोअर कमिटीमधील आपल्या जवळच्या मित्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आपल्याला माहिती दिली, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे. आपल्याला तिकीट न दिल्याने माझ्यासह अजून दहा बारा जागांचे नुकसान पक्षाला सोसावे लागले. एखाद दुसऱ्या व्यक्तीच्या हट्टापाई पक्षाचे नुकसान झाल्याचे सांगत खडसे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
पक्ष सोडण्याचे वृत्त एकनाथ खडसे यांनी फेटाळून लावले आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेऊन मी त्यांना सर्व सांगितले. त्यांनी माझ्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेण्याचे आश्वासन दिले. पण, त्यांच्यासोबतच्या भेटीत पूर्ण समाधान झाले नाही. मी भाजपातच आहे आणि भाजपातच राहणार आहे, असा पुनर्उच्चारही खडसे यांनी केला.