पुणे : काँग्रेसचे भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी आज पुण्यातील काँग्रेस भवनामध्ये चांगलाच राडा घातला आहे. काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये थोपटे यांना स्थान न दिल्याने नाराज कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनाची मोडतोड केल्याची प्राथमिक माहिती असून थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी पक्ष नेतृत्वाविरोधात देखील घोषणाबाजी केली.
आमदार थोपटे हे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव असून महाआघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संग्राम थोपटे यांचा समावेश केला जाईल असा अंदाज बांधला जात होता मात्र काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये थोपटे यांना स्थान मिळाले नाही. काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्याने काँग्रेसमधील अनेक ‘घराणी’ नाराज असून त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा एक व्हिडीओ उपलब्ध झाला असून व्हिडिओमध्ये पुण्यातील काँग्रेस भवनाच्या आतील दालनातील खुर्च्या, टेबल व काचेच्या सामानाची तोडफोड करण्यात आल्याची दृश्य दिसत आहेत.
तत्पूर्वी, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोहळा पार पडला असून यामध्ये ३६ नव्या मंत्र्यांना स्थान दिले गेले आहे. मात्र काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या मंत्रिपदाच्या यादीत सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे, संग्राम थोपटे व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.