पिंपरी – दापोडी येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या टेम्पोमधून कांद्याचे कॅरेट अज्ञात चोरट्याने चोरून नेले. तसेच परिसरात लावलेल्या आठ रिक्षांवरील प्लॅस्टिकचे हुड ब्लेडने कापले. ही घटना मंगळवारी (दि. 24) सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली.
इब्राहीम इस्माईल शेख (वय 32, रा. दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडीमधील न्यू गुलाबनगर सार्वजनिक शौचालयाजवळ सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास रिक्षा आणि टेम्पो पार्क केले होते. अज्ञात चोरट्याने पार्क केलेल्या आठ रिक्षांवरील प्लॅस्टिकचे हुड ब्लेडने फाडून त्याचे नुकसान केले. एका रिक्षातील बॅटरी चोरून नेली. तर एका टेम्पोतील कांद्याचे कॅरेट चोरी करून नेले. हा प्रकार मंगळवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास उघडकीस आली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून या भागातील अनेक रिक्षांच्या बॅटरी चोरीस जात आहेत. तसेच रिक्षांचे हुड ब्लेडने फाडत आहेत. यापूर्वी देखील या परिसरात असे प्रकार घडल्याचे नगरसेवक रोहित काटे यांनी सांगितले. पोलिसांनी टवाळखोरांवर कारवाई केल्यामुळे काही दिवस हा प्रकार बंद होता. मात्र, त्यानंतर आता पुन्हा हा प्रकार सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.