पॉवर ट्रान्समिशन टॉवरची राणी – सीता बेहेरा

कटक – पुरुषांच्या मक्तेदारीचं क्षेत्र म्हणून इलेक्‍ट्रीकल पॉवरच्या टॉवरवरच्या कामाकडं नेहमीच पाहिलं जातं उच्च दाब अर्थात हायव्होल्टेज लाईन्स आणि जमिनीपासून 50 पेक्षा जास्त फुटांवरचं काम, तेही लोखंडी सांगाड्याच्या टॉवरवरचं. पण या कामातही ओडिशामधल्या सीता बेहेरा या इलेक्‍ट्रीशियननी आपला ठसा उमटवला आहे. सध्या सीता बेहेरा ही ओडिशामधल्या तरुणींची आयकॉन बनली आहे.

सीता बेहेरा ही हालाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेली मुलगी. ती आता ओडिशा पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ती नोकरी करते. ती 50 फूट उंच ट्रान्समिशन टॉवरवर चढून धोका पत्करत जबाबदारीनं काम करते. म्हणून तिला “ट्रान्समिशन टॉवरची राणी’ असं म्हटलं जातं. काही दिवसांपूर्वी तिचा ओडिशा कौशल्य विकास महामंडळातर्फे सत्कार करण्यात आला. कॉलेजमध्ये सीताला आमंत्रित केलं जातं. ती मुलींना प्रोत्साहनपर भाषण देते. तिच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक मुली प्रगतीची वाट धरत आहेत.

मुलगी शिकली, प्रगती झाली, हे घोषवाक्‍य सीता बेहेराच्या बाबतीत तंतोतंत खरं ठरलं. सीता ही कॉलेजमध्ये गेलेली तिच्या सोरेन नामक छोटेखानी गावातली पहिलीच तरुणी. कॉलेजच्या सुट्ट्यांमध्ये ती जेव्हा आपल्या घरी यायची तेव्हा बरेच जण तिची खिल्ली उडवायचे. पॅंट आणि शर्ट घालते म्हणूनही तिला नावं ठेवण्यात आली. पण यापैकी कशालाही ती बधली नाही. सीता तिच्या कॉलेजमध्ये तांत्रिक शिक्षण घेत होती. तांत्रिक शिक्षणाकडे महिला फारसं वळत नाहीत. पण सीता इलेक्‍ट्रीशियन झाली.

सीतामुळे तिच्या कुटुंबाला दोन वेळचं अन्न मिळू लागलं आहे. तिच्या सहा सदस्यांचं कुटुंब आज सुखी आहे. सीताला तीन भावंड. चार भावंडांमध्ये सीता सर्वात लहान. दोन बहिणी, एक भाऊ आणि आई-वडील असं तिचं कुटुंब आहे. सीताचं बालपण कष्टात गेलं. मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करणं या तिच्या पालकांना शक्‍य होत नव्हतं. त्यामुळे फक्त सीता आणि तिच्या भावाला शिक्षण घेता आलं. पालक अशिक्षित असल्यामुळे आपल्या मुलांना अभ्यासाबाबत मार्गदर्शन करू शकत नव्हते.

सीताने सगळं शिक्षण स्वत:च्या हुशारीच्या बळावर पूर्ण केलं. दहावी पूर्ण झाल्यानंतर तिने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. यात तिला भावाच्या मित्राची मदत झाली. इथे गेल्यावर तिला समानतेची जाणीव झाली. या संस्थेत स्त्री आणि पुरुष असा भेदभाव नव्हता. आज सीता ही असंख्य मुलींसाठी प्रेरणास्थान बनून गेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.