संतोष पवार
31 डिसेंबरच्या निवडीकडे लक्ष; इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग
सातारा – सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापतींची निवड मंगळवारी (दि. 31) होत असून सभापतीपदाची कोणाला लॉटरी लागणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात असून इच्छुकांनी सभापतीपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु केले आहे.
सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापतीपदाची आरक्षण सोडत दि. 11 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली होती. आरक्षण सोडतीनंतर इच्छुक सदस्यांना सभापतीपदाचे वेध लागले आहेत. त्यानुसार इच्छुकांनी जोरदार लॉबिंग करत नेतेमंडळींकडे सभापतीपद आपणास कसे मिळवता येईल यासाठी फिल्डिंग लावली आहे. नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या असल्याने प्रत्येक गट, गण निहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी तपासण्याचे काम सध्या सुरु आहे. संबंधित तालुक्यातील समतोल साधत सभापती, उपसभापती पद कोणाला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
सातारा पंचायत समितीची सत्ता भाजपचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे आहे. यापूर्वी सभापतीपद खेड गणातील मिलिंद कदम व उपसभापतीपद लिंब गणातील जितेंद्र सावंत यांच्याकडे होते. सातारा पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे.
या पदासाठी किडगाव गणातील सरिता इंदलकर व अंबवडे गणातील विद्या देवरे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. इंदलकर व देवरे यांनी जोरदार लॉबिंग सुरु केले असून दोन्ही सदस्यांच्या गणात पक्षाचे चांगले काम झाले आहे. याचबरोबर वर्णे गणातील कांचन काळंगे, अतित गणातील बेबीताई जाधव, शेंद्रे गणातील छाया कुंभार यांचीही नावे चर्चेत आहेत. ऐनवेळी आ. शिवेंद्रराजे कोणाला संधी देतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.
कोरेगाव पंचायत समितीची सत्ता माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे आहे. सध्या राजाभाऊ जगदाळे सभापती आणि उत्तर कोरेगावचे संजय साळुंखे उपसभापती आहेत. याठिकाणी सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने पुन्हा विद्यमान पदाधिकारीच राहणार की उत्तर कोरेगावच्या संजय साळुंखे यांना बढती देवून सभापतीपद मिळणार? याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. शशिकांत शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने तालुक्यात राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी ऐनवेळी दुसरा उमेदवार येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
वाई पंचायत समितीवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता असून सभापतीपदाचे आरक्षण इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले आहे. पाचवड गणातील संगीता चव्हाण या सभापतीपदासाठी एकमेव दावेदार असल्याने त्यांची निवड जवळ जवळ निश्चित मानली जात आहे. उपसभापतीपदासाठी अभेपुरी गणातील विक्रांत डोंगरे आणि ओझर्डे गणातील मधुकर भोसले यापैकी आ. मकरंद पाटील कोणाला संधी देतात याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. वाईत सभापतीपदासाठी रस्सीखेच नसली तरी उपसभापतीपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु आहे.
फलटण पंचायत समितीवर ना. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली निर्विवाद सत्ता आहे. सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. या पदासाठी आसू गणाचे सदस्य व जिल्हा बॅंकेचे संचालक शिवरुपराजे खर्डेकर, वाठार निंबाळकर गणाचे सदस्य विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्यात रस्सीखेच आहे.
उपसभापतीपदासाठीही अनेकजण इच्छुक आहेत. कराड पंचायत समितीमध्ये आ. बाळासाहेब पाटील आणि उंडाळकर गटाने एकत्रित येवून सत्ता प्रस्थपित केली होती. अडीच – अडीच वर्षाच्या फॉर्मुल्यानुसार आता बाळासाहेब पाटील गटाचा सभापती होणार आहे. कराड पंचायत समितीचे सभापतीपद अनुसुचित जातीसाठी आरक्षित झाले असून या पदावर उंब्रज गणाच्या सदस्या सुषमा नागे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
उपसभापती पदी तळबीड गणाचे प्रणव ताटे यांची दावेदारी महत्वाची मानली जात आहे. मात्र नुकताच विधानसभा निवडणुकीचा आखाडा झाला असल्याने ऐनवेळी नाट्यमय राजकीय घडामोडी घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
पाटण पंचायत समितीत राष्ट्रवादीची सत्ता असून पुढील अडीच वर्षासाठी सभापतीपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. या पदासाठी शिरळ गणातील राजाभाऊ शेलार आणि म्हावशी गणातील उज्ज्वला लोहार यांच्यात रस्सीखेच आहे.
शेलार यांचा अनुभव पाहता त्यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर सभापती, उपसभापतीपदी कोणाला संधी देतात? याकडे लक्ष लागून राहिले आहे. जावळी पंचायत समितीवर आ. शिवेंद्रराजे यांची निर्विवाद सत्ता आहे. सभापतीपदाचे आरक्षण इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाल्याने सौ. जयश्री गिरी या सभापतीपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.
शिवेंद्रराजे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राजीनामा देत भाजपमधून विधानसभा निवडणूक लढवून विजयश्री खेचून आणली होती. सध्याचे पक्षीय बलाबल पाहता शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली याठिकाणी सभापती, उपसभापतींच्या निवडी होतील, असेच चित्र आहे. मात्र शिवेंद्रराजेंना मानणारे विद्यमान पंचायत समिती सदस्य हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले असल्याने तांत्रिकदृष्ट्या अडचणी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
खटाव पंचायत सभापती पदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. पुसेसावळी गणातील जयश्री कदम व रेखा घार्गे या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. खटाव पंचायत समितीवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता असून पक्षश्रेष्ठी कोणास संधी देतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
महाबळेश्वर पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. विद्यमान सभापती रुपाली राजपुरे की अंजना कदम यांना पक्ष संधी देणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
उपसभापतीपदासाठी पण जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
माण पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले आहे. निवडीदरम्यान नाट्यमय घडामोडी झाल्या नाहीत तर कविता जगदाळे यांना संधी मिळू शकते. लतिका विरकर याही सभापतीपदाच्या शर्यतीत आहेत. खंडाळा पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. या पदावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेंद्र तांबे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. उपसभापतीपदासाठी कोणाला संधी मिळणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.