देशात सध्या आर्थिक मंदीचे वातावरण आहे. बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा वेळी प्रत्येक घटकाने आपापल्या परीने योगदान देऊन अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी पाउल उचलणे आवश्यक बनले आहे. खास करुन आहे रे वर्गाकडून नाही रे वर्गासाठी काही तरी केले जाण्याची अपेक्षा आहे. ही अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने एक पाऊल बॉलीवूडची अभिनेत्री कॅटरिना कैफने टाकले आहे.
अलीकडेच सुरू झालेल्या सौंदर्यप्रसाधनांच्या एका उत्पादनातून होणारा नफा कॅटरिनाने सामाजिक संस्थेला देणगी स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सामाजिक संस्था उपेक्षित शहरांमधील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काम करणार आहे. कॅटरिना म्हणते की, आर्थिक मदतीपेक्षा गरजवंतांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून दिल्यास सामाजिक उत्थानाची प्रक्रिया सुलभ आणि गतिमान बनण्यास हातभार लागू शकतो. कॅटरिनाकडून ज्या संस्थेला मदत देण्यात येणार आहे ती संस्था बिहारमधील असून या संस्थेतर्फे ग्रामीण भागातील महिलांना जुन्या रद्दी पेपरपासून पेन्सिल बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.
कॅटरिनाने लॉंच केलेल्या सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केल्यानंतर ही पेन्सिल ग्राहकांना मोफत देण्यात येईल. कॅट सांगते की आम्ही जेव्हा या नव्या उत्पादनांचा विचार केला तेव्हापासूनच या योजनेविषयी काम सुरु केले. आपल्या नफ्यातून समाजाला काय देता येईल हा विचार आम्ही केला. ग्रामीण भागातील महिलांना थेट आर्थिक मदत देण्यापेक्षा रोजगार उपलब्ध करुन देण्याची संकल्पना मला अधिक चांगली वाटली आणि आज मी या संस्थेशी जोडली गेली आहे याचा मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो! कॅटचे हे पाऊल समाजहितेची अनेक कामे करणाऱ्या बॉलीवूडमधील कलाकारांसाठी पथदर्शी ठरणारे आहे.