विजयसिंह मोहिते पाटलांच्या उत्तराने राजकीय वर्तुळात “ट्विस्ट’
रेडा – लोकसभा निवडणुकीपूर्वी विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये कटुता निर्माण झाली होती. त्यातच मोहिते पाटलांनी भाजपच्या व्यासपीठावर उपस्थिती दर्शवून एकच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर तब्बल सहा महिन्यांनंतर शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील एकमेकांसमोर आले. यावेळी दोघांमध्ये व्यासपीठावर जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दल कोणताही तपशील मिळू शकला नसला तरी दोघांमध्ये “साखर’ चर्चा रंगल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान, मी राष्ट्रवादीच असल्याचे मोहिते पाटलांनी सांगून पुन्हा एकदा बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे ही साखर चर्चा राजकारणात आणखी काही ट्विस्ट निर्माण करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त इन्स्टिट्युटच्या परिसरात आज राजकीय नेत्यांची मांदियाळी होती. या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोहोचण्यास उशीर होत असल्याने व्यासपीठावर नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. शरद पवार इतर नेत्यांसोबत गप्पा मारत असतानाच विजयसिंह मोहिते पाटील तिथे पोहोचले. यावेळी शरद पवार यांनी त्यांना समोरील खुर्चीवर बसण्यास सांगितले. दोघांमध्ये यावेळी जवळपास 15 मिनिटे चर्चा सुरू होती. मात्र, नेमकी काय चर्चा झाली याचा खुलासा झाला नसला तरी यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतले अनेक मातब्बर नेते पक्ष सोडून भाजपमध्ये गेले. त्याचदरम्यान मोहिते पाटीलही राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जातील अशा चर्चा होत्या. तसेच मोहिते-पवार संबंध आता फार बरे नसल्याचे बोलले जात होते; परंतु आज मोहिते-पवार एकचा मंचावर दिसले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेश केला. माढा मतदारसंघात रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा प्रचारही केला. निवडणुकीच्या तोंडावर विजयसिंह मोहिते पाटीलही भाजपच्या मंचावर पाहायला मिळाले. अकलूजमध्ये झालेल्या भाजपच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजयसिंह मोहिते पाटलांचा सत्कार केला होता.
त्यामुळे मुलगा भाजपमध्ये गेल्यानंतर आता विजयसिंह मोहिते पाटीलदेखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या. परंतु आपण अजूनही राष्ट्रवादीतच आहोत, असे मोहिते पाटील यांनी आज स्पष्ट करून सर्व वावड्या असल्याचे जणू सूतोवाच दिले आहेत.
ही भेट राजकीय मास्टर स्ट्रोक ठरणार?
लोकसभा निवडणुकीपूर्वी माढा लोकसभा मतदारसंघातील नाट्यमय घडामोडीनंतरही रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपात प्रवेश केला असला तरी अजूनही पक्षात असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. ज्यांना जायचे होते ते गेले, यावर मी कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही, असे पत्रकार परिषदेत पवारांनी घोषित केले होते.
मात्र, आज पवारांनी मोहिते पाटलांशी केलेली चर्चा अन् मोहिते पाटलांनी आपण राष्ट्रवादीच असल्याचे सांगितल्याने त्यांनी पुन्हा पवारांशी सुत जुळवून घेतले आहे का, असा सवाल उपस्थित होत आहेत, तर पक्षाने कारवाई न केल्याने त्यांचे पक्षातील स्थानही अबाधीत असल्याचे आज दोघांमध्ये झालेल्या चर्चेवरून स्पष्ट होत असले तरी आजची भेट आगामी काळात राजकीय मास्टर “स्ट्रोक’ ठरणार का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
मी राष्ट्रवादीच – मोहिते पाटील
मी राष्ट्रवादीतच आहे. आपण कुठेही गेलो नसल्याचे, मोठे वक्तव्य विजयसिंह मोहिते पाटलांनी केले आहे. मी राष्ट्रवादीतच, कुठेही गेलो नव्हतो आणि जाणारही नाही, असे मोहिते पाटील म्हणाले आहेत, तसेच शरद पवार यांना पुण्यात भेटण्याआधी दोन-तीनवेळा भेटलो असल्याचेही मोहिते पाटलांनी स्पष्ट केले.