मेढा – जिल्हा परिषदेमधील कुडाळ गटातील पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची जय्यत तयारी प्रत्येक पक्षाची सुरू असून राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक पवार यांनी मेढा येथे राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस या महाशिवआघाडीतर्फे जोरदार शक्तीप्रदर्शन करत मंगळवारी अर्ज दाखल केला आहे. येत्या 12 डिसेंबरला ही निवडणूक होणार असून 13 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
माजी जि. प. सदस्य दीपक पवार यांनी जिल्हा परिषद सदस्याचा राजीनामा दिल्यानंतर कुडाळ गटासह जावळी तालुका या पोटनिवडणुकीसाठी उत्सुक होता. आता मात्र ही लढाई प्रतिष्ठेची असून यात अनेक दिग्गजांनी उडी घेतली आहे. यात राष्ट्रवादी व शिवसेना यांनी दीपक पवार यांच्या नावाला सहमती दाखवून प्रचंड शक्तीप्रदर्शन व फटाक्यांच्या अतिषबाजी करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
राष्ट्रवादीचे माजी आ. शशिकांत शिंदे व भाजपचे विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोन्ही आमदारांच्या प्रतिष्ठेची असणाऱ्या कुडाळ जिल्हा परिषद पोटनिवडणुकीकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद सदस्याचा कार्यकाल भले ही दोन वर्षाचा राहिला असला तरी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये कोणत्या गटाचे वर्चस्व राहणार ते येत्या 13 डिसेंबरला दिसून येणार आहे. तर दीपक पवार हे जिल्ह्याच्या राजकारणातील मातब्बर नेते असल्याने या निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाला आहे. या पदयात्रेमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेनेचे एकनाथ ओंबळे, तालुका प्रमुख विश्वनाथ धनावडे, सचिन दळवी व महाशिवआघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.